मुंबईत लपलेल्या कोलकाता बॉम्बस्फोट-फायरिंग प्रकरणातील तिघांना अटक; क्राईम ब्रांच युनिट-६ची कारवाई

मुंबईत लपलेल्या कोलकाता बॉम्बस्फोट-फायरिंग प्रकरणातील तिघांना अटक; क्राईम ब्रांच युनिट-६ची कारवाई

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : कोलकात्यातील शिबपूर परिसरात झालेल्या फायरिंग आणि बॉम्बस्फोट प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-६ने देवनार परिसरातून अटक केली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मे २०२६ रोजी दुपारी शिबपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १०० ते १५० जणांच्या जमावाने हिंसक हल्ला केला होता. या हल्ल्याचे नेतृत्व शमीम अहमद उर्फ ‘बोरे’, आफताब अनवर, जमील अख्तर आणि त्यांच्या साथीदारांनी केल्याचा आरोप आहे. आरोपींनी परिसरात बॉम्बफेक आणि अंधाधुंद गोळीबार केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत फिर्यादीसह अनेक जण जखमी झाले होते.

या प्रकरणी शिबपूर पोलीस ठाणे, हावडा येथे एफआयआर क्रमांक १८८/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-६चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांना आरोपी देवनार येथील एकता एसआरए इमारतीत लपल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आठव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ८०७वर छापा टाकला. यावेळी तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शमीम अहमद अब्दुल रशीद (४०), जमील अख्तर अख्तर अली (४३) आणि आफताब अनवर खुर्शीद अनवर (४४) यांचा समावेश आहे.

चौकशीदरम्यान तिन्ही आरोपींचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना पुढील कारवाईसाठी शिबपूर पोलीस ठाणे, हावडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon