मित्रासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असल्याच्या रागातून तरुणीसह तिच्या मित्रावर असिड हल्ला; आरोपीला कर्नाटकमधून बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तू माझी नाही झालीस, तर कोणाची नाहीस असे म्हणत पुण्यात तरुणी आणि तिच्या मित्रावर असिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन या प्रकरणातील आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.
मित्रासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असल्याच्या रागातून तरुणाने असिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणत एका माथेफिरुने तरुणीवर आणि तिच्या मित्रावर असिड हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. श्रीराम मधु सरुनवर (२०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ वर्षीय पीडित तरुणीने याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार २० मे रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ताडीवाला रोड येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिचा मित्र हे दोघे पुण्याच्या एका हॉटेलमध्ये काम करतात. काम संपल्यानंतर बुधवारी पहाटे दोघेही ताडीवाला रोड येथील आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होते. याचवेळी आरोपी सरुनवर दबा धरुन बसला होता. पीडित तरुणी ही त्याचा रोष झुगारुन मित्रासोबत लिव्ह-इनमध्ये राहते, याचा राग त्याच्या मनात होता. श्रीरामने तिचा रस्ता अडवला आणि तू माझ्यासोबत का राहत नाहीस? तू माझी नाही तर कोणाचीच होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
काही समजण्याच्या आतच, आरोपीने स्वतःसोबत आणलेल्या प्लास्टिक ड्रममधील ‘असिड’सारखा तीव्र ज्वलनशील रासायनिक पदार्थ तरुणीच्या अंगावर फेकला. हे केमिकल तरुणीच्या मानेवर, पाठीवर आणि दोन्ही पायांवर पडल्याने ती जागीच होरपळली. आरोपीने तिच्या मित्रांवर सुद्धा असिड फेकले, ज्यामुळे त्याच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. दोघेही जखमी झाले असताना, आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन तिथून पसार झाला. शहराच्या मध्यवस्तीत तरुणीवर असिड हल्ला झाल्याचे समजताच पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर पोलिसांनी थेट कर्नाटक गाठत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.