दामदुप्पट परताव्याचे आमिष; कोल्हापुरात जवळपास ६५ लाखांची फसवणूक, सहाजणांविरोधात गुन्हा
पोलीस महानगर नेटवर्क
कोल्हापूर : गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची तब्बल ६४ लाख ९८ हजार ८९७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार समीर सुभाष नार्वेकर याच्यासह अन्य संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
याप्रकरणी वीणा नितीन लकडे (वय ४२, रा. पुईखडी, राधानगरी रोड, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर सुभाष नार्वेकर (रा. माणगाव, जि. रत्नागिरी), नेहा समीर नार्वेकर, चिन्मय पालकर, विजय तपाडे, निखिल सुर्वे आणि अमित बालम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत संशयितांनी ताराराणी चौक परिसरात ‘टीजेडब्ल्यू लर्निंग सोल्यूशन’ तसेच संलग्न कंपन्यांची कार्यालये सुरू केली होती. कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर शहर, जिल्हा तसेच कर्नाटकात विविध सेमिनार आयोजित करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात आले.
गुंतवणुकीवर अल्पावधीत दामदुप्पट परतावा मिळेल, असे आश्वासन देत अनेकांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उभी करण्यात आली. फिर्यादी वीणा लकडे यांनी १७ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. याशिवाय आणखी नऊ गुंतवणूकदारांकडून एकूण जवळपास ६५ लाख रुपये जमा करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
मात्र, गुंतवणुकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी तगादा लावण्यास सुरुवात केली असता, संशयितांनी कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केल्याचे उघड झाले. यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आल्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.