कल्याण गुन्हे शाखेची कारवाई; मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवर बनावट स्टिकर लावून विक्री करणारे दोघे अटकेत

कल्याण गुन्हे शाखेची कारवाई; मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांवर बनावट स्टिकर लावून विक्री करणारे दोघे अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश करत कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने डोंबिवली आणि भिवंडी येथील दोन इसमांना अटक केली आहे. मुदत संपलेल्या व्हिटॅमिन्स आणि पौष्टिक खाद्यपदार्थांवरील मूळ एक्सपायरी डेट झाकून त्यावर बनावट स्टिकर लावून नव्याने मुदत वाढविल्याचे भासवून हे पदार्थ बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे २६ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स, पौष्टिक खाद्यपदार्थ, पॅकिंग साहित्य तसेच बनावट स्टिकर्सचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुदत संपलेल्या उत्पादनांच्या बॉक्सवरील मूळ एक्सपायरी डेट काढून त्याठिकाणी नव्याने तयार केलेले स्टिकर चिकटवत होते. त्यानंतर हे पदार्थ ‘आरोग्यदायी’ आणि ‘पौष्टिक’ असल्याचा दावा करत बाजारात विक्रीसाठी वितरित केले जात होते.

या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः व्हिटॅमिन्स आणि खाद्यपदार्थांच्या स्वरूपातील उत्पादने मुदत संपल्यानंतर वापरल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीनुसार छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. याप्रकरणी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon