पोलीस ठाण्यासाठी राखीव भूखंडावर अतिक्रमण; उल्हासनगरमध्ये भूमाफियाविरुद्ध गुन्हा
महेंद्र (अण्णा) पंडित / ठाणे
उल्हासनगर : उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यासाठी राखीव ठेवलेल्या शासकीय भूखंडावर बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी एका भूमाफियाविरुद्ध हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगर पाच येथील स्वामी शांती प्रकाश आश्रमाजवळील गायकवाडपाडा परिसरात हा प्रकार उघडकीस आला.
हिललाईन पोलीस ठाण्यातील लेखनिक कारकून वर्षा देशपांडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार, पंकज वसंत भोईर याच्याविरोधात शासकीय भूखंडावर बेकायदा प्रवेश करून कोणतीही महापालिका अथवा पोलीस विभागाची परवानगी न घेता बांधकाम केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, उल्हासनगर पाच येथील गायकवाडपाडा परिसरातील सर्व्हे क्रमांक १७२ असलेला भूखंड महाराष्ट्र शासनाने हिललाईन पोलीस ठाण्याच्या उभारणीसाठी राखीव ठेवला आहे. संबंधित भूखंडाचा सातबारा देखील पोलीस विभागाच्या नावावर आहे.
मंगळवारी हिललाईन पोलीस ठाण्यातील हवालदार अजित साळुंखे हे परिसरात गस्त घालत असताना या भूखंडावर सुमारे २० बाय २० फूट आकाराचे बांधकाम उभारण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती दिल्यानंतर वर्षा देशपांडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पोलीस ठाण्यासाठी राखीव जागेवर भव्य बेकायदा बांधकाम झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता हे बांधकाम पंकज भोईर याने केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तत्काळ उल्हासनगर महापालिकेला याची माहिती देत कारवाईची मागणी केली. त्यानुसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने बांधकाम जमीनदोस्त केले.
वेळीच कारवाई झाली नसती तर संबंधित भूखंडावर पक्के बांधकाम करून तो बळकावण्याचा प्रयत्न झाला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी हिललाईन पोलीस पुढील तपास करत आहेत.