भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू तर २० जण जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर लाल परीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे.अहिल्यानगर-भिवंडी एसटी बसचा भीषण अपघात झाला असून चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. अहिल्यानगरहून भिवंडीच्या दिशेने सुमारे ३० प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी झाली.बेल्हे फाट्याजवळील गुंजाळवाडी परिसरात भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस पलटी झाली, त्यानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली.
भीषण अपघातात बसचे चालक एम. वाय. सलीम यांचे जागीच निधन झाले असून एका प्रवाशाचाही मृत्यू झाला आहे. तर १५ जण जखमी झाले असून त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे अधिकारी आरगडे यांनी दिली आहे.अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.
अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले.अपघानंतर बसची दुरावस्था पाहून पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बसची अवस्था कशी आहे याचा प्रत्यय येतो. बसचा अक्षरश: भुगा झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, अपघातानंतर प्रवाशांची नशिबानेच आपला जीव वाचल्याचं सांगितलं, यावेळी काही प्रवाशांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचंही दिसून आलं.