बंदीच्या इशाऱ्यांनंतरही मुंब्रा वाय जंक्शनवर बेकायदा बकरा मंडई

खर्डी रोड नाका, शिळफाटा परिसरात अवैध पार्किंग; वीज चोरीच्या आरोपांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह
दैनिक पोलीस महानगरकडून सहाय्यक आयुक्तांना निवेदन देऊन कारवाई मागणी
ठाणे : मुंब्रा परिसरातील वाय जंक्शन, खर्डी रोड नाका आणि शिळफाटा ब्रिजखाली वाढलेल्या अनधिकृत प्रकारांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बंदीची मागणी, तक्रारी आणि आंदोलनाच्या इशाऱ्यांनंतरही वाय जंक्शन परिसरात बेकायदा बकरा मंडई भरवण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मंडईसाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसून स्वच्छतेच्या नियमांचेही पालन केले जात नाही. त्यामुळे परिसरात घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी करून मंडई रोखण्याची मागणी केली होती. गरज पडल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही मंडई सुरू झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, खर्डी रोड नाका आणि शिळफाटा ब्रिजखाली मोठ्या प्रमाणावर अवैध पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतुकीचा वेग मंदावतो. रुग्णवाहिका आणि अन्य आपत्कालीन सेवांनाही मार्ग काढताना अडचणी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
याशिवाय, अनधिकृत बाजार आणि दुकानांमध्ये बेकायदेशीर वीज जोडण्या घेऊन वीज चोरी होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत असून परिसरातील वीज पुरवठ्यावरही परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गंभीर प्रकार समोर येऊनही संबंधित विभागांकडून कठोर कारवाई होत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या संदर्भात ठाणे महानगरपालिका, मुंब्रा प्रभाग समिती, टोरेंट पावर आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रारी दिल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समिती आणि टोरेंट पावरच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केल्याचे सांगितले जात असले, तरी त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अनधिकृत बकरा मंडई तात्काळ हटवावी, अवैध पार्किंगवर कठोर कारवाई करावी, वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी दैनिक पोलीस महानगरकडून ठाणे आयुक्त, उपायुक्त (अतिक्रमण विभाग) व सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
मुंब्रा परिसरातील वाढती अव्यवस्था ही केवळ स्थानिक समस्या नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.