मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल; सहा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई : राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता मुंबई पोलीस दलातही मोठे प्रशासकीय फेरबदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस दलातील सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश रविवारी जारी करण्यात आले. कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने हे फेरबदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (एन) (२) अन्वये हे आदेश जारी करण्यात आले असून, पोलीस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी काळातील सुरक्षेची आव्हाने, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचा विचार करून या बदल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार डीसीपी मनीष कलवानिया यांची परिमंडळ ८ वरून परिमंडळ १ येथे बदली करण्यात आली आहे. डीसीपी राघासुधा आर यांची परिमंडळ ४ वरून परिमंडळ २ येथे नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष कृती दलात कार्यरत असलेले निमित्त गोयल यांची परिमंडळ ८ मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच डीसीपी मोहित कुमार गर्ग यांची परिमंडळ २ वरून परिमंडळ ९ येथे बदली करण्यात आली आहे. राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी संदीप घुगे यांना परिमंडळ ११ ची जबाबदारी देण्यात आली आहे. फोर्स वनचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले गजानन राजमाने यांची परिमंडळ १२ मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस दलातील हे फेरबदल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. विशेषतः फोर्स वन आणि राज्य गुप्त वार्ता विभागासारख्या संवेदनशील विभागांमध्ये कामाचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या परिमंडळांची जबाबदारी देण्यात आल्याने गुन्हेगारी नियंत्रण, गुप्त माहिती संकलन आणि जलद प्रतिसाद यंत्रणा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबईसारख्या महानगरात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनात सातत्याने बदल आणि पुनर्रचना केली जाते. त्याच पार्श्वभूमीवर या बदल्यांकडे पाहिले जात असून, नव्या नियुक्त अधिकाऱ्यांसमोर गुन्हेगारी नियंत्रणाबरोबरच सायबर गुन्हे, संघटित गुन्हेगारी आणि वाहतूक व्यवस्थापनासारखी मोठी आव्हाने असणार आहेत.