सफाळ्यात रेशन दुकानात मारहाणीचा प्रकार
बायोमेट्रिक मशीन फोडल्याचा आरोप; दुकानदार व ग्राहकांविरोधात पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल
पालघर / नवीन पाटील
पालघर तालुक्यातील सफाळे येथे रेशन वितरण केंद्रात झालेल्या वादातून बुधवारी सकाळी मारहाणीची घटना घडली असून, बायोमेट्रिक मशीन फोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात दुकानदार व ग्राहकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मला प्रदीप पांढरे (वय ४५), रा. नारोडा, मराठी शाळेमागे, सफाळे या रेशनिंग दुकानदार असून, बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सफाळे तलाठी कार्यालयाशेजारी रेशन वाटपाचे काम सुरू होते. यावेळी आरती प्रशांत पाटील व प्रशांत प्रभाकर पाटील, रा. धाकवाडी, सफाळे यांनी व्हेरिफिकेशन करण्याची मागणी केली.
त्यावर दुकान मालक निर्मला पांढरे यांनी रेशन वाटप सुरू असल्याने थोडा वेळ थांबण्यास सांगितल्याचा याचा राग आल्याने आरती पाटील यांनी मोठ्याने ओरडत वाद घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर दोघींमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन मारहाण झाली. दरम्यान, प्रशांत पाटील यांनी टेबलवरील बायोमेट्रिक मशीन खाली आपटून त्याचे नुकसान केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी सफाळे पोलिस ठाण्यात दुकानदार व ग्राहकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफाळे पोलिस करत आहेत.