मध्य रेल्वेचा आजपासून सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक; कुर्ला ते भांडुपदरम्यान काही लोकल सेवांत बदल तर काही मार्गात बदल

मध्य रेल्वेचा आजपासून सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक; कुर्ला ते भांडुपदरम्यान काही लोकल सेवांत बदल तर काही मार्गात बदल

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आजपासून सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेत आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकातील मध्यवर्ती पादचारी पुलाचा (एफओबी) गर्डर बसवण्याच्या कामासाठी १५ ते १८ मे दरम्यान विशेष वाहतूक आणि बीजपुरवठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे कुर्ला ते भांडुपदरम्यान काही लोकल सेवांत बदल करण्यात आले तर काही मार्गात बदल करण्यात आले आहेत. गर्डरचे काम रात्री तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. विद्याविहार स्थानकातील इंटरमीडिएट फूटओव्हर ब्रिजच्या गर्डर लाँचिंगसाठी शुक्रवारपासून सलग तीन रात्री विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला जाणार. या ब्लॉकच्या अवधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.

आधीच मध्य रेल्वे उशीराने धावत असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यात ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचे होणार हाल होणार हे नक्की आहे. शुक्रवारी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ४.१५ पर्यंत, शनिवारी रात्री १२.१० ते पहाटे ४.४० पर्यंत आणि रविवारी मध्यरात्री १.१५ ते पहाटे ३.०५ पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रात्री ११.३० ते १२.१२ वाजेपर्यंत कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

कसाऱ्याहून रात्री १० वाजल्यापासून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून सुटलेल्या काही गाड्यांचा प्रवास कुर्ला येथे तर अप दिशेने येणाऱ्या काही गाड्यांचा प्रवास ठाणे येथे संपेल. तीन दिवसांच्या ब्लॉक काळात लोकल सेवा कोलमडणार असल्याने नोकरदारांची घरी परतताना गैरसोय होणार आहे.

यादरम्यान काही लोकल प्रशासनाकडून रद्द देखील केल्या जाणार आहेत. ठाणे येथून रात्री ११.४० वाजता सुटणारी ठाणे-कुर्ला लोकल तसेच पहाटे ४.०४ वाजता सुटणारी ठाणे-सीएसएमटी लोकल ट्रेन रद्द केली जाईल. सीएसएमटीहून रात्री ११.३८ आणि १२.२४ मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी-ठाणे लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon