बकराईदपूर्वी जनावर वाहतूकदारांना त्रास होऊ नये; शासनाकडे खाटिक असोसिएशनची मागणी
रवि निषाद / मुंबई
मुंबई : मुस्लिम समाजाचा प्रमुख सण असलेल्या बकराईदनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील देवनार कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर जनावरांची बाजारपेठ भरविण्यात येणार आहे. १७ मे ते २८ मे दरम्यान ही मंडई सुरू राहणार असून, विविध राज्यांतून सुमारे एक हजार वाहने जनावरे घेऊन मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जनावर वाहतूकदारांना महामार्ग पोलिसांकडून होणारा कथित त्रास थांबविण्याची मागणी ऑल महाराष्ट्र खाटिक असोसिएशन आणि महाराष्ट्र वाहतूक सेनेने शासनाकडे केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, गृह सचिव तसेच राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले आहे. धुळे जिल्ह्यातील सांगवी, शिरपूर तसेच धुळे-जळगाव महामार्ग परिसरात जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलिसांकडून अडवून त्रास दिला जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
ऑल महाराष्ट्र खाटिक असोसिएशनचे अध्यक्ष हाजी अखिल ताडे यांनी सांगितले की, कुर्बानीसाठी मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर जनावरे महाराष्ट्रात आणली जातात. मात्र, या वाहनांना काही ठिकाणी विनाकारण अडवून त्रास दिला जातो. त्यामुळे शासनाने संबंधित पोलिसांना स्पष्ट सूचना देऊन अशा वाहनांना अनावश्यक त्रास देऊ नये, असे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“कुर्बानीसाठी जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनांना कुठल्याही प्रकारचा अन्याय किंवा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही विविध स्तरांवर पत्रव्यवहार केला आहे. शासनाने याची दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी,” अशी अपेक्षा हाजी अखिल ताडे यांनी व्यक्त केली.