अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित; तब्बल १४३ वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप

अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित; तब्बल १४३ वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांनंतर आता प्रशासकीय अधिकारीही अडचणीत आल्याचं दिसतंय. अशोक खरात सोबत आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप असलेल्या उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडेच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे.उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे याला अशोक खरात प्रकरण चांगलंच भोवल्याचं चित्र आहे. अशोक खरातसोबत असलेले आर्थिक व्यवहार त्याच्या अंगलट आले आहे. अशोक खरात याच्यासोबतच अभिजित भांडे याचे कॉल रेकॉर्डस हाती आल्यानंतर महसूलमंत्र्यांनी त्याच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

भोंदू अशोक खरात आणि उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांच्यामध्ये तब्बल १४३ वेळा फोन कॉल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अशोक खरातने अभिजीत भांडेला ८३ वेळा कॉल केले आहेत. तर भांडेने खरातला ६० वेळा कॉल केले आहेत.४ एप्रिल २०२५ ते १५ मार्च २०२६ या दरम्यान, अभिजीत भांडे आणि अशोक खरात यांच्यामध्ये हे कॉल झाल्याची माहिती आहे. या दोघांच्या दरम्यान १०,०३७ सेकंद म्हणजे जवळपास ३ तास कॉल झाल्याचं समोर आलं आहे. ७ ऑगस्ट २०२५ रोजी या दोघांच्या दरम्यान ११ मिनिटे चर्चा झाली होती. तर ७ जुलै २०२५ रोजी, एकाच दिवसात १० कॉल तर २३ नोव्हेंबर २०२५ रोजी १४ वेळा कॉल झाल्याचं रेकॉर्ड समोर आलं.

याच पुराव्याच्या आधारे आता अभिजीत भांडे याच्या निलंबनाचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांच्या नंतर आता अभिजीत भांडेची देखील चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अभिजीत भांडे हा उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत होता. अशोक खरातच्या मुलीच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या जमिनीमध्ये गुंतवणूक केल्याप्रकरणी आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशोक खरातशी संबंधित अनेक कामांमध्ये अभिजीत भांडेची गुंतवणूक असल्याचा आरोप केला जात आहे. आता त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर खरातशी संबंधित इतर महसूल अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणल्याची चर्चा आहे.शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राजकारणी अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणात संबंधित सर्वांची चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या प्रकरणात कुणालाही सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे अशोक खरातशी संबंधित प्रशासकीय अधिकारी अडचणीत आले असल्याची चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon