दिग्दर्शकाच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाहिजे आरोपी आग्र्यातून अटकेत, मोक्का अंतर्गत कारवाई

दिग्दर्शकाच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाहिजे आरोपी आग्र्यातून अटकेत, मोक्का अंतर्गत कारवाई

सुधाकर नाडार / प्रतिनिधी 

मुंबई : जुहू परिसरातील सिनेमा दिग्दर्शकाच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील पाहिजे आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उत्तर प्रदेशातील आग्रा येथून अटक केली. प्रदीपकुमार रामसिंग जाठव उर्फ गाठ (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला आज विशेष मोक्का सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

१ फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भा.न्या.सं.च्या विविध कलमांसह हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाकडून सुरू होता.

या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

तपासादरम्यान अटक आरोपी प्रदीपकुमार जाठव हा घटनास्थळी उपस्थित असल्याचे निष्पन्न झाले. गोळीबार करणाऱ्या आरोपींसोबत राहून त्यांना चिथावणी देणे आणि सहाय्य करणे, अशी त्याची भूमिका असल्याचे तपासात समोर आले आहे.

मुंबई गुन्हे शाखेने १६ एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बाह पोलीस ठाण्याच्या हद्दीतून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon