गोवंडीतील समस्यांवर नगरसेवक जमीर कुरेशी यांचा अधिकाऱ्यांसोबत झंझावाती दौरा; पायाभूत सुविधांवर भर

गोवंडीतील समस्यांवर नगरसेवक जमीर कुरेशी यांचा अधिकाऱ्यांसोबत झंझावाती दौरा; पायाभूत सुविधांवर भर

रवि निषाद / मुंबई

मुंबई : गोवंडी परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत स्थानिक नगरसेवक जमीर कुरेशी यांनी बीएमसी एम-पूर्व विभागातील अधिकाऱ्यांसह झंझावाती दौरा करत प्रश्नांचा आढावा घेतला. कायदा-सुव्यवस्था, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते व उद्यानांच्या दुरवस्थेसह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

या दौऱ्यात बीएमसी एम-पूर्व वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे तसेच इतर विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते. बैगनवाडी प्रभाग क्रमांक १३६ मधील विविध भागांची पाहणी करून स्थानिक नागरिकांच्या तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या.

देवनार डम्पिंगजवळील बंद पोलिस बीट पुन्हा सुरू करून तेथे कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी कुरेशी यांनी केली. पोलीस ठाणे दूर असल्याने नागरिकांना अडचणी येतात आणि त्याचा गैरफायदा गुन्हेगार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैगनवाडीतील उद्यानांची दुरवस्था गंभीर असल्याचे निदर्शनास आणून देताना कुरेशी यांनी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली बाग देखभालीअभावी ओस पडत असल्याची खंत व्यक्त केली. तसेच डम्पिंग रोडवरील रस्त्यांची अत्यंत खराब अवस्था, पावसाळ्यात होणारी चिखलाची समस्या आणि वाहतुकीची कोंडी याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कमलाराम परिसरातील नाले बांधकाम आणि साफसफाई प्रलंबित असल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. बैगनवाडी सिग्नलपासून आतील भागात जाणाऱ्या मार्गावर होणारी तीव्र वाहतूक कोंडी ही आणखी एक गंभीर समस्या असून, यामुळे रुग्णवाहिका व अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन सेवांनाही अडथळे निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दोन उद्यानांदरम्यान असलेल्या मोकळ्या जागेतून अतिरिक्त रस्ता काढून बंद केलेला रस्ता क्रमांक १५ पुन्हा सुरू करावा, अशी मागणीही त्यांनी केली. प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देत नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.

यावेळी सहाय्यक आयुक्त उज्ज्वल इंगोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांनी संबंधित समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon