तंबाखूच्या किरकोळ वादातून खून; २४ वर्षांनंतर आरोपी जेरबंद

तंबाखूच्या किरकोळ वादातून खून; २४ वर्षांनंतर आरोपी जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : तंबाखू मागण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात तब्बल २४ वर्षे फरार असलेल्या आरोपीला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. वेषांतर करून ओळख लपवत पोलिसांना चकवा देणाऱ्या या सराईत गुन्हेगाराला डोंगरदऱ्यांमध्ये सापळा रचून पकडण्यात आले. २००२ मधील या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे.

पोलि

सांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हा तालुक्यात २००२ साली बाबुराव रामभाऊ मरगळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. तंबाखू मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हिऱ्या उर्फ हिरामण शिवराम पवार याने काठीने मारहाण केली होती. या मारहाणीत मरगळे यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख बदलत विविध ठिकाणी वास्तव्य केले. दीर्घकाळ तपास प्रलंबित असताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणाचा पुन्हा छडा लावण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपी रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागात लपून राहत असल्याची माहिती मिळाली.

यानंतर सहाय्यक फौजदार प्रदीप कुदळे आणि पोलीस हवालदार सोमेश राऊत यांनी लाकूड व्यापाऱ्यांचे सोंग घेत आरोपीपर्यंत पोहोचण्याची योजना आखली. संवाद साधून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आरोपीला संशय आल्याने तो पळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले.

या कारवाईस स्थानिक पोलीस पाटील व स्थानिक पोलिसांचे सहकार्य लाभले. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते यांच्यासह पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon