खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; पाच आरोपी जेरबंद, व्यावसायिकाची सुखरूप सुटका

खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण; पाच आरोपी जेरबंद, व्यावसायिकाची सुखरूप सुटका

पोलीस महानगर नेटवर्क 

पुणे : खराडी परिसरात ५० लाखांच्या खंडणीसाठी मेट्रो ठेकेदाराचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. तसेच अपहरण करण्यात आलेल्या ठेकेदाराची सुखरूप सुटका करण्यात आली. या धाडसी कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

१४ एप्रिल २०२६ रोजी खराडी येथील इराणी कॅफेसमोर खडी क्रशर प्लांटसाठी जागा दाखवण्याच्या बहाण्याने आरोपींनी ठेकेदाराला त्यांच्या वाहनात जबरदस्तीने बसवून अपहरण केले. त्यानंतर त्याला पुणे-नगर रोड परिसरातील विविध ठिकाणी फिरवत मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडून व त्याच्या कुटुंबीयांकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.

या प्रकरणी ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीवरून खराडी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी सागर झुरुंगे याचा सहभाग उघडकीस आला.

आरोपींनी फॉर्च्युनर, स्कॉर्पिओ आणि फोर्ड एंडेव्हर अशा विविध वाहनांचा वापर करून ठेकेदाराला लोणीकंद, शिक्रापूर, सणसवाडी आणि रांजणगाव परिसरात फिरवले. दरम्यान, पोलिसांनी पेरणे येथे नाकाबंदी करून आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर पाचही जणांना वाहनांसह ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सागर दत्तात्रय झुरुंगे (३९), विजय वाळुंज (३८), राजू सहाणे (३२), रुपेश गावडे (३८) आणि प्रकाश उर्फ बाळू राऊत (३४) यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन फॉर्च्युनर, एक स्कॉर्पिओ, मोबाईल फोन असा सुमारे ४९.१० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon