ओळखीच्या तरुणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
संगमेश्वर (रत्नागिरी): शिक्षणासाठी पुण्यात राहणाऱ्या संगमेश्वरच्या अल्पवयीन मुलीला ओळखीच्या तरुणाने वासनेची बळी बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक संबंधांचा फायदा घेत आणि घरच्यांना मारण्याची धमकी देऊन आरोपीने दोन दिवस सातत्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.
पीडित मुलगी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होती आणि पुण्यात भावाकडे राहत होती. १७ एप्रिलच्या सकाळी आरोपी युसूफ मोहमद सय्यद (रा. आंबेड खुर्द, संगमेश्वर) आपल्या निळ्या रंगाच्या कारमधून पीडितेच्या दारात आला. ‘घरच्यांना त्रास होईल’ अशी धमकी देत त्याने तिला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत अत्याचार केला. दुसऱ्या दिवशीही त्याने पुन्हा दुसऱ्या हॉटेलमध्ये नेून अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले.
पीडित मुलगी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. आरोपी सापडताच त्याला ताब्यात घेण्यात आले. हा गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आरोपी युसूफ सय्यदला तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून खडक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक पातळीवर आरोपीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.