खाजगी फोटो व्हायरलची धमकी; शरीरसुखाची मागणी करणारा आरोपी जेरबंद

खाजगी फोटो व्हायरलची धमकी; शरीरसुखाची मागणी करणारा आरोपी जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : शहरात सायबर छळाचा आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला असून ओळखीच्या महिलेचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शरीरसुखाची मागणी करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने महिलेच्या नकळत तिचे वैयक्तिक स्वरूपाचे काही फोटो मिळवले होते. त्यानंतर या फोटोंच्या आधारे त्याने महिलेचा छळ सुरू केला. संबंधित फोटो पती व नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. वारंवार फोन व संदेशांद्वारे मानसिक छळ केल्याने महिला त्रस्त झाली होती.

सुरुवातीला बदनामीच्या भीतीने महिलेने दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्रास वाढत गेल्याने तिने अखेर दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

दरम्यान, आरोपीने अशाच प्रकारे इतर महिलांनाही त्रास दिला आहे का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांनी वैयक्तिक माहिती व फोटो सुरक्षित ठेवावेत, तसेच कोणत्याही प्रकारचा छळ झाल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon