मुंबईतल्या प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ग्राहकाकडून साखरेचा घोटाळा; स्टोअरला लावला हजारो रुपयांचा चुना

Spread the love

मुंबईतल्या प्रसिद्ध डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ग्राहकाकडून साखरेचा घोटाळा; स्टोअरला लावला हजारो रुपयांचा चुना

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबईतील मालाड परिसरातील एका नामांकित डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक आणि अजब घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात ग्राहकाने गेल्या सात महिन्यांपासून स्टोअरला गंडा घालत तब्बल ८६० किलो साखरेची अफरातफर केली आहे. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३७,००० रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित स्टोअरमध्ये साखरेची ५० किलोची मोठी पोती विक्रीसाठी उपलब्ध असतात. स्टोअरच्या नियमानुसार या ५० किलोच्या प्रत्येक पोत्यावर दोन बारकोड लावलेले असतात, एक ३० किलोचा आणि दुसरा २० किलोचा. ग्राहकाने बिलिंग काउंटरवर गेल्यावर दोन्ही बारकोड स्कॅन करून ५० किलोचे पैसे भरणे अपेक्षित असते.

जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत एका ग्राहकाने एकूण ४३ वेळा साखरेची पोती खरेदी केली. पण प्रत्येक वेळेस हा ग्राहक अतिशय चतुराईने पोत्यावरील २० किलोचा बारकोड काढून टाकत असे. बिलिंग काउंटरवर पोहोचल्यावर केवळ ३० किलोचा बारकोड स्कॅन केला जात असे. जेव्हा कर्मचाऱ्यांना संशय यायचा किंवा वजनाबद्दल विचारणा व्हायची, तेव्हा हा ग्राहक हुशारीने कर्मचाऱ्यांवर दबाव टाकायचा आणि पोत्यात फक्त ३० किलोच साखर असल्याचा दावा करून उरलेली २० किलो साखर विनामूल्य मिळवायचा. अशा प्रकारे प्रत्येक वेळी २० किलो साखरेचे पैसे न भरता त्याने एकूण ८६० किलो साखर फुकट मिळवली.

स्टोअरच्या तक्रारीवरून बांगूर नगर पोलिसांनी आता या स्मार्ट चोराचा शोध सुरू केला आहे. बारकोडमधील तांत्रिक बाबींचा फायदा घेऊन ग्राहकाने स्टोअरला गंडा घातल्याने व्यापारी वर्गात खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon