कल्याणमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी खाजगी एजंटचे घृणास्पद कृत्य
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी खाजगी एजंटने घृणास्पद प्रकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट तयार करून अश्लील मेसेज आणि व्हिडिओ इतरांना पाठवले असल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात संबंधित केवायसी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिलं आहे. कल्याणमधील मोहने परिसरात एक धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे न आल्याने केवायसी करण्यासाठी संपर्क साधलेल्या खाजगी एजंटने महिलेची फसवणूक करत तिच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला योजनेचे पैसे मिळत नव्हते. चौकशी केल्यानंतर केवायसी न झाल्यामुळे पैसे येत नसल्याचं तिला समजले. परिसरातील काही लोकांच्या सांगण्यावरून तिने ऋतिक खंडारे नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधला, जो केवायसी करून देतो अशी माहिती देण्यात आली होती. आरोपीने केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि एक हजार रुपये घेतले. तसेच ओटीपी प्रक्रियेसाठी महिलेचा मोबाइल देखील काही वेळासाठी स्वतःकडे घेतला. मात्र, काही दिवस उलटल्यानंतरही केवायसी पूर्ण झाली नाही आणि महिलेला पैसे मिळाले नाहीत. यानंतर संबंधित महिलेपाशी एक व्यक्ती येऊन तक्रार करू लागला की तिच्या नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवले जात आहेत. ही बाब ऐकून महिला चक्रावली, कारण तिला इन्स्टाग्रामबद्दल माहितीही नव्हती
महिलेच्या मुलीने तपास केला असता ऋतिक खंडारे या एजंटने महिलेचा मोबाइल वापरून तिच्या नावाने इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून लोकांना अश्लील संदेश पाठवले असल्याचे उघड झाले. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात संबंधित आरोपी ऋतिक खंडारे याला नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी अशा प्रकारच्या एजंट्सपासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.