ठाणे-मुलुंड दरम्यान धर्मवीर आनंद दिघे स्थानक!

Spread the love

ठाणे-मुलुंड दरम्यान धर्मवीर आनंद दिघे स्थानक!

ठाणे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यास मंजूरी

योगेश पांडे / वार्ताहर

ठाणे – ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकाच्यादरम्यान उभारल्या जात असणार्‍या नवीन स्थानकासाठी २५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी केली होती. हा निधी अश्विनी वैष्णव यांनी मंजूर केला असून तो प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे गेल्याने लवकरच स्थानकाचे काम मार्गी लागणार आहे. आता या स्थानकाला ‘ धर्मवीर आनंद दिघे स्थानक ‘ असे नाव देण्याची मागणी संसदेत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने केली.

ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानक उभारण्यात येत आहे. काही काळापासून हे काम संथ गतीने सुरु होते. आता या कामासाठी २५० कोटींचा निधी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मंजूर केला आहे. याबद्दल संसदेत खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांचे ठाणेकरांच्या वतीने जाहीर आभार मानत या नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे रेल्वे स्थानक नाव देण्याची मागणी केली.तसेच ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत ठाणे रेल्वे स्थानकाच्या मोठ्या दर्जाच्या अपग्रेडेशनचा प्रस्तावासाठी ९४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षात आहे. तो प्रस्ताव मध्य रेल्वे विभागाने सादर केला आहे. मात्र तो रेल्वे बोर्डाकडे प्रलंबित आहे. तो त्वरित मंजूर करावा अशीही मागणी खासदार म्हस्के यांनी केली.

ठाणे स्थानकावर गोरगरिब प्रवाशांसाठी ‘इमर्जन्सी मेडिकल क्लिनिक’ पुन्हा सुरू करावे, कोरोना काळात बंद केलेली ज्येष्ठ नागरिक सवलत त्वरित सुरू करावी, जुलैमध्ये वेलंकणी स्पेशल ट्रेन, मुंबई (दादर) आणि चिपळूण दरम्यानची ‘नमो भारत’ किंवा एसी ट्रेन आणि ठाणे ते कसारा, कर्जत आणि खोपोली दरम्यानची ‘शटल लोकल’ यांची वारंवारता वाढवावी. दुरांतो एक्सप्रेसना पनवेल, कल्याण, ठाणे किंवा दादर येथे ‘कमर्शियल हॉल्ट’ द्यावा; ठाणे स्थानकाला मुलुंडकडे जाणाऱ्या प्लॅटफॉर्म १, ७ आणि ८ ला जोडणाऱ्या एफओबी आणि प्लॅटफॉर्म ५, ६, ७, ८, ९ आणि १० वर एस्केलेटरची तातडीने आवश्यकता आहे, ते काम लवकर सुरु करावे,कळवा-ऐरोली एलिव्हेटेड लिंकचे काम जलद करावे आणि ठाणे स्थानकाचे प्लॅटफॉर्म सर्व गाड्यांसाठी १२ ते १५ कोच बसवण्यासाठी वाढवावेत; या आणि इतर अनेक मागण्या म्हस्के यांनी संसदेत केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon