मंदिराच्या पुजाऱ्यासह सात जणांवर विनयभंगाचा गुन्हा; अंधेरीतील प्रकाराने खळबळ

मंदिराच्या पुजाऱ्यासह सात जणांवर विनयभंगाचा गुन्हा; अंधेरीतील प्रकाराने खळबळ

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अंधेरी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली असून, एका महिलेचा विनयभंग, मारहाण आणि छळ केल्याप्रकरणी सात जणांविरोधात अंधेरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात एका प्रसिद्ध हनुमान मंदिराच्या पुजाऱ्याचाही समावेश असल्याने परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत ही घटना घडली. पीडित महिला आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असताना आरोपींनी कट रचून तिला लक्ष्य केल्याचे तक्रारीत नमूद आहे. बिंदू शर्मा, निलम गुप्ता, सत्यप्रकाश दुबे, मुन्ना ऊर्फ सोनार, लीना कपूर, सुजाता विश्वास आणि एका अज्ञात व्यक्तीने मिळून महिलेला मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग करून जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७४ (विनयभंग), ७९ (लैंगिक छळ), ११५(२) (स्वेच्छेने दुखापत), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी), ३५२ (मारहाण) आणि ३(२) (सामूहिक गुन्हा) यांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आरोपींपैकी सत्यप्रकाश दुबे हा स्थानिक हनुमान मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. धार्मिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या सहभागामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विविध महिला संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून संबंधित पुजाऱ्याला पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपींच्या अटकेसाठी हालचाली वेगाने सुरू असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon