अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या प्रियकराचा खून; आरोपी पती चार तासांत अटकेत
शिळ–डायघर पोलिसांची जलद कारवाई; लोखंडी हातोड्यासह आरोपी ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीचा लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार करून खून केल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली असून शिळ–डायघर पोलिसांनी आरोपी पतीला अवघ्या चार तासांत अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ मार्च रोजी सकाळी १० ते १० मार्च रोजी सकाळी ११.४० या कालावधीत पिंपरी गाव, डायघर येथील सर्व्हे क्रमांक ६९ मधील भाताच्या शेतात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीची ओळख प्रकाश बिसा (वय ४०, मूळ रा. हसनगंज, उत्तर प्रदेश) अशी झाली. तो नवी मुंबईतील महापे येथे ‘साई प्रसाद स्नॅक्स सेंटर’मध्ये वेटर म्हणून काम करत होता.
या प्रकरणी हॉटेल मालक जितेंद्र उत्तम पाटील (रा. वडवली खुर्द, कल्याण) यांच्या तक्रारीवरून शिळ–डायघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिळ–डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी तपासासाठी दोन पथके तयार केली. गुप्त माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेत रामराय दासू जाधव (वय ३९, रा. शिळगाव, ठाणे) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याची पत्नी शोभाबाई जाधव हिचे मयत प्रकाश बिसा याच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. या रागातून त्याने प्रकाश बिसा याला दारू पिण्याच्या बहाण्याने पिंपरी गावातील भाताच्या शेतात नेऊन लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार करून ठार मारल्याचे उघड झाले.
या प्रकरणाचा कसोशीने तपास करून आरोपीला हत्यारासह चार तासांत अटक करण्यात शिळ–डायघर पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस उपआयुक्त (परिमंडळ १) सुभाषचंद्र बुरसे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया डमाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या तपासात पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजेंद्र राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खरात, अनिल राजपूत, योगेश लामखडे, शहाजी शेळके, संतोष चव्हाण तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.