डोंबिवलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; चार महिन्यांनंतर ५ लाखांच्या खंडणीची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडलेला हा विद्यार्थी गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असून, अज्ञात व्यक्तीकडून आता ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी काही महिन्यांपूर्वी परीक्षा देण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, गेल्या आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीने विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. सुरुवातीला संशयिताने ५० हजार रुपये पाठवण्याची मागणी केली. त्यानंतर विद्यार्थ्याचा एक फोटो पाठवून तो तात्काळ डिलीट करण्यास सांगितले. तसेच पोलिसांना माहिती दिल्यास विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी धमकीही देण्यात आली.
यानंतर संशयिताने थेट ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अखेर कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अपहरण आणि खंडणीच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. विद्यार्थ्याचा ठावठिकाणा लावण्यासाठी तांत्रिक तपासासह विविध पथके कार्यरत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.