कर्तव्यात हलगर्जीपणाचा ठपका; लोणी काळभोरचे ग्राम महसूल अधिकारी निलंबित
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई; विभागीय चौकशीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
पोलीस महानगर नेटवर्क
लोणीकाळभोर : कर्तव्यात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याच्या आरोपांमुळे लोणी काळभोर येथील ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब श्रीपती वनवे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ अन्वये वनवे यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, लोणी काळभोर कार्यालयाच्या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
सदर अधिकारी पदावर कार्यरत असताना कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१)(अ) अंतर्गत अधिकार वापरून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत ते निलंबित राहणार आहेत.
निलंबन काळात बाळासाहेब वनवे यांचे मुख्यालय तहसिल कार्यालय, जुन्नर येथे निश्चित करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, निलंबनाच्या कालावधीत संबंधित अधिकाऱ्याने कोणतीही खासगी नोकरी स्वीकारू नये किंवा कोणताही व्यवसाय करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. नियमांनुसार त्यांना निलंबन निर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येणार असले तरी प्रत्येक वेळी भत्ता स्वीकारण्यापूर्वी त्यांनी खासगी नोकरी किंवा व्यवसाय करत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.
तसेच तहसिलदार, लोणी काळभोर यांना वनवे यांच्या दप्तराची तपासणी करून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार विभागीय चौकशीचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.