टिळक नगर पोलिसांची कामगिरी; हरवलेले ४४ मोबाईल तक्रारदारांना परत
सुमारे ६.८० लाखांच्या मोबाईल हँडसेटचा शोध; नागरिकांकडून समाधान व्यक्त
रवि निषाद / मुंबई
मुंबई : होळीच्या पार्श्वभूमीवर हरवलेले मोबाईल शोधून ते संबंधित तक्रारदारांना परत देत टिळक नगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवाईत एकूण ४४ मोबाईल हँडसेट परत मिळवण्यात पोलिसांना यश आले असून त्यांची एकूण किंमत सुमारे ६ लाख ८० हजार रुपये आहे.
परिमंडळ सहाच्या अधिपत्याखालील टिळक नगर पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती झोन ६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, झोन ६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख, देवनार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आबुराव सोनवणे तसेच टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष ढेंमरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता दिवस पाळीचे पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक संगम गुरसळे व सायबर पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल राठोड, पोलीस हवालदार पुरुषोत्तम महाजन तसेच महिला पोलीस शिपाई पावसे यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना मोबाईल परत देण्यात आले.
टिळक नगर पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. दरम्यान, या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी टिळक नगर पोलिसांचे कौतुक केले.