मुख्यमंत्र्यांनी स्टे देऊनही महापौरांचा बीएमसी इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश; प्रशासनात संभ्रमाचे वातावरण

Spread the love

मुख्यमंत्र्यांनी स्टे देऊनही महापौरांचा बीएमसी इंजिनिअर्सच्या बदलीचा आदेश; प्रशासनात संभ्रमाचे वातावरण

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांचा विषय आता चांगलाच तापला असून, पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपमध्ये वादाचे नवे केंद्र तयार झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांना स्थगिती दिली असतानाच, महापौर रितू तावडे यांनी या बदल्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला पत्र लिहिल्याने संभ्रमाचं वातावरण आहे.

मात्र, प्रशासक काळात झालेल्या या बदल्यांमध्ये अनियमितता असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशामुळे बदली प्रक्रियेला ब्रेक लागला होता.

मुख्यमंत्री स्तरावरून स्थगिती आदेश कायम असतानाच, महापौर रितू तावडे यांनी अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्युनिसिपल इंजिनिअर युनियनने दिलेल्या निवेदनाचा संदर्भ दिला आहे. नियमांनुसार या बदली आदेशांच्या अंमलबजावणीबाबत तत्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत. एकीकडे मुख्यमंत्र्यांची स्थगिती आणि दुसरीकडे महापौरांचे अंमलबजावणीचे आदेश, अशा कात्रीत पालिका प्रशासन अडकले असून अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

या पत्राने केवळ प्रशासकीय नव्हे तर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनीच या बदल्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती, ज्यानंतर स्थगिती देण्यात आली. आता महापौर रितू तावडे यांनी त्याच बदल्यांच्या बाजूने पत्र दिल्याने मुंबई भाजपमध्ये दुफळी पडल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon