बारामतीत देहव्यापाराच्या अवैद्द अड्ड्यावर छापा; पाच जणांना ताब्यात घेत चार महिलांची सुटका
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती – पुण्यातील बारामती तालुका पोलिसांनी भिगवण रोडवरील प्रणव लॉजवर छापा टाकत देहव्यापाराच्या अड्ड्यावर मोठी कारवाई केली. या कारवाईत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी याबाबत बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सोमनाथ महादेव खोमणे, धिरज रामभाऊ जाधव, सागर संजय सोडबुके, मेराजुल जानीफ अली, अफजल मझीबर रहमान हुसेन आणि सदाम जुमरुद्दीन हुसेन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी भिगवण रोडवरील प्रणव लॉज येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवित असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या कारवाईत पोलिसांनी आसाम येथील रहिवासी असलेल्या तीन वय ३० वर्षे , वय २१ वर्षे , वय २६ वर्षे आणि पश्चिम बंगाल येथील एक वय २२ वर्षे अशा चार महिलांची सुटका केली.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ तसेच स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अंतर्गत कलम 4 व 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे करत आहेत. या कारवाईमुळे लॉजिंग व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.