आधी ‘अजब’ उड्डाणपूल, आता ‘विचित्र’ शौचालय; मिरा-भाईंदरमधील एमएमआरडीए च्या कारभाराची लक्तरे वेशीवर

Spread the love

आधी ‘अजब’ उड्डाणपूल, आता ‘विचित्र’ शौचालय; मिरा-भाईंदरमधील एमएमआरडीए च्या कारभाराची लक्तरे वेशीवर

योगेश पांडे / वार्ताहर

मिरा-भाईंदर – मिरा-भाईंदर शहर सध्या आपल्या विकासकामांच्या ‘अजब’ डिझाईनमुळे पुन्हा एकदा देशभर चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरत आहे. याआधी उड्डाणपुलाच्या विचित्र रचनेवरून प्रशासनाला लक्ष्य करणाऱ्या नेटिझन्सनी आता शहरातील एका सार्वजनिक शौचालयाचे फोटो व्हायरल करत ‘नियोजनशून्य कारभारा’वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाईंदर (पूर्व) येथील आरएनपी पार्क परिसरात २००७ साली ‘निर्मल भारत अभियान’ अंतर्गत बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयात चार स्टेनलेस स्टीलची शौचालयं एकमेकांना खेटून बसवण्यात आली आहेत. या शौचालयासाठी स्वतंत्र दरवाजे किंवा गोपनीयता राखणारे पार्टिशन्स नसल्याने हे शौचालय पुन्हा एकदा वादाच्या भोवरऱ्यात सापडले आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार ही लहान मुलांसाठीची सोय असली, तरी सार्वजनिक ठिकाणी गोपनीयता आणि स्वच्छतेचा अभाव असल्याची टीका नागरिक करत आहेत.

केवळ शौचालयच नव्हे, तर नुकताच चर्चेत आलेला मिरा रोड-भाईंदर उड्डाणपूलही इंजिनिअरिंगचा एक थट्टा नमुना ठरत आहे. ४-लेनने सुरू होणारा हा पूल अचानक मध्येच अरुंद होऊन २-लेनचा होतो. या ‘बॉटलनेक’ रचनेमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे. “हे कसले इंजिनिअरिंग?” असा संतप्त सवाल विचारत नागरिक प्रशासनाच्या नियोजनाची खिल्ली उडवत आहेत.

एमएमआरडीए कडून करण्यात आलेल्या या दोन्ही कामांमुळे शहराच्या विकासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “नियोजनशून्य कारभार” अशा शब्दात नेटिझन्स प्रशासनावर तुटून पडत आहेत. इंजिनिअरिंगचे हे नमुने शहरासाठी सोयीचे ठरण्याऐवजी उपहासाचा विषय ठरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon