डोंबिवलीत ऑनलाइन गुंतवणूक घोटाळा; ९४ लाखांची फसवणूक, सात गुंतवणूकदारांची तक्रार
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : झटपट व आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली मोठा फसवणूक प्रकार उघडकीस आला असून सात गुंतवणूकदारांची तब्बल ९४ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे.
ही घटना गांधीनगर व २७ गाव परिसरातील हेदुटणे येथे घडली. प्राथमिक माहितीनुसार, भामट्यांनी बनावट ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि आकर्षक गुंतवणूक योजनांचा वापर करून नागरिकांना जाळ्यात ओढले. अल्पावधीत मोठा परतावा मिळेल, असे आश्वासन देत विविध टप्प्यांत पैसे उकळण्यात आले.
फसवणुकीतील प्रमुख प्रकरणांमध्ये सुहास नेहते यांची १७.७७ लाख रुपयांची, तर एस. कोटेश्वर सुबुधी यांची ६५.५० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. इतर काही गुंतवणूकदारांचाही यात समावेश असून एकूण रक्कम ९४ लाखांहून अधिक आहे. गेल्या वर्षभरात ही फसवणूक टप्प्याटप्प्याने करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, संबंधित आरोपींचा शोध सुरू असून नागरिकांनी ऑनलाइन गुंतवणूक करताना पडताळणी करूनच व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.