कल्याण स्टेशनलगत चार हॉटेलांचा बेकायदा बहर; एमआरटीपी कायद्याला हरताळ
‘क’ प्रभागात कारवाईला ब्रेक? हप्तेखोरीच्या आरोपांत प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह


कल्याण : शहराच्या मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या कल्याण (प.) रेल्वे स्थानक परिसरात चार हॉटेलांकडून सर्रास बेकायदेशीर बांधकामे उभारण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ‘हॉटेल संतोष’, ‘हॉटेल विकास’, ‘हॉटेल अमर पॅलेस’ आणि ‘हॉटेल विश्व पॅलेस’ या आस्थापनांनी कोणतीही वैध परवानगी न घेता तळमजले व पोटमाळे उभारल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवरही तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांनुसार, संबंधित हॉटेलांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता बांधकामे केली असल्याचे ‘क’ प्रभाग कार्यालय आणि नगररचना विभागाच्या नोंदींमध्ये स्पष्ट झाले आहे. मात्र, इतकी ठोस माहिती समोर येऊनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) कायद्यानुसार अशा प्रकरणांत तात्काळ गुन्हे नोंदवून अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणे आवश्यक असते. परंतु, या प्रकरणात दीर्घकाळ दिरंगाई होत असल्याने न्यायालयीन आदेशांचाही अवमान होत असल्याची टीका करण्यात येत आहे.
🔴 अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या हॉटेलांनी अग्निशमन नियमांचेही उल्लंघन केल्याचा आरोप असून, फायर ऑडिटमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. भविष्यात आग किंवा अन्य दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
🔴 सहाय्यक आयुक्तांवर निष्क्रियतेचे आरोप
या प्रकरणात ‘क’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त थोरात यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर ठोस पावले उचलली जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय अधिक गडद होत आहे.
🔴 “महापालिकेची प्रतिमा मलिन”
महापालिका आयुक्तांनी अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी, महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
📦 बॉक्स :
तक्रारींचा भडिमार, तरीही कारवाई शून्य
कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल अमर पॅलेस, हॉटेल विकास, हॉटेल संतोष, हॉटेल विश्व पॅलेस तसेच इतर आस्थापनांविरोधात वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्याचे सांगितले जाते. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल तसेच अनधिकृत बांधकाम विभागाच्या उपायुक्तांकडेही याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
तथापि, अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने “या हॉटेलांना प्रशासनाचे अभय आहे का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी कधी होणार, अशी मागणी कार्यकारी संपादक प्रकाश संकपाळ यांनी केली आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात केवळ बेकायदेशीर बांधकामाचाच मुद्दा नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा व संभाव्य गैरव्यवहारांचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित हॉटेलांवर तातडीने कारवाई करून एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, तसेच जबाबदार सहाय्यक आयुक्त थोरात या अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.