नागपूरच्या काटोलमध्ये स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू, १५ जण जखमी
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथून एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत रविवारी सकाळी ७ वाजता मोठा स्फोट झालाय. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भीषण स्फोटात १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.
दरम्यान, या भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज होऊन एकच खळबळ उडाली. तर या भीषण स्फोटात जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.मोठ्या प्रमाणात झालेल्या स्फोटनंतर परिसरात आगही लागली, दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशामक विभगाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं. दुसरीकडे परिसरात मृतकांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाला. नागरिकांमध्ये मोठा रोष उसळल्याचेही चित्र बघायला मिळत आहे. SBL कंपनीत रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या स्फोटाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
दरम्यान, या स्फोटाच्या अपघातावर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी १५ मृत्यू आणि २० जखमी झाले असल्याचे सांगितले आहे. या ठिकाणी कंपनीकडून सुरक्षितते बद्दल मोठं दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी केलाय. प्रशिक्षणा शिवाय आणि कुठलीही आवश्यक ती काळजी न घेता कामगार वापरले जातात, असा त्यांचा आरोप आहे.