नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण; मुख्य आरोपी आनंद पटेलच्या कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास उघड

नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणाला नवे वळण; मुख्य आरोपी आनंद पटेलच्या कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास उघड

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या कथित ड्रग्स पार्टी प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असताना आता या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या आनंद पटेल याच्या कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहास उघडकीस आला असून, त्याचे वडील लखन पटेल हे कल्याण-डोंबिवली परिसरातील कुख्यात रेशनिंग माफिया असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, लखन पटेल याच्यावर सरकारी रेशनिंग धान्याच्या काळाबाजार, अफरातफर आणि तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गरीब आणि गरजूंना मिळणारे धान्य खुले बाजारात चढ्या दराने विकल्याचे आरोप त्याच्यावर वारंवार झाले आहेत. या गैरप्रकारांमुळे प्रशासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करत महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक कृत्ये (MPDA) कायद्यांतर्गत त्याला अटक करून कारागृहातही डांबले होते.

इतकेच नव्हे, तर रेशनिंग धान्याच्या संघटित तस्करीप्रकरणी लखन पटेल आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गतही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आनंद पटेलचा गुन्हेगारी पार्श्वभूमीशी असलेला संबंध अधिकच अधोरेखित होत आहे.

दरम्यान, नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणकोणाचे धागेदोरे समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्थिक, सामाजिक आणि गुन्हेगारी स्तरावर या प्रकरणाचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon