महापालिका भवनातच चोरीचा धक्कादायक प्रकार; नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून २० हजारांची रोकड लंपास

महापालिका भवनातच चोरीचा धक्कादायक प्रकार; नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून २० हजारांची रोकड लंपास

पोलीस महानगर नेटवर्क

मुंबई : शहराच्या प्रशासनाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या महापालिका भवनातच चोरीची घटना घडल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका लक्ष्मी भाटिया यांच्या पर्समधून सुमारे २० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्थायी समितीची बैठक संपल्यानंतर नगरसेवक जेवणासाठी गेले असताना हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. भाटिया यांनी सभागृहात आपली पर्स ठेवली होती. मात्र जेवणावरून परत आल्यानंतर पर्सची चैन उघडी आढळून आली. पर्स तपासल्यावर त्यामधील २० हजार रुपयांचे बंडल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी तत्काळ सहकारी नगरसेवकांना माहिती दिली.

या घटनेची माहिती पोलिसांसह संबंधित प्रशासकीय आणि सुरक्षा विभागांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी घटना घडली त्या स्थायी समिती सभागृहात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत.

“महापालिका ही शहराची तिजोरी मानली जाते. इथेच अशी घटना घडत असेल, तर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात,” असा संतप्त सवाल भाटिया यांनी उपस्थित केला. त्यांनी कोणावर थेट आरोप केला नसला तरी सभागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

दरम्यान, मनसेचे गटप्रमुख यशवंत किल्लेदार यांनीही या प्रकारावर टीका करत, “सभागृहातच सुरक्षेची अशी अवस्था असेल, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?” असा सवाल उपस्थित केला.
या घटनेमुळे महापालिका भवनातील सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon