धडाकेबाज कारवाई : वाशीमध्ये अफूच्या बेकायदा शेतीवर पोलिसांचा छापा; ५८ किलो ओला अफू जप्त, तिघांना अटक

Spread the love

धडाकेबाज कारवाई : वाशीमध्ये अफूच्या बेकायदा शेतीवर पोलिसांचा छापा; ५८ किलो ओला अफू जप्त, तिघांना अटक

पोलीस महानगर नेटवर्क

वाशी : वाशी तालुक्यातील ईट उपक्षेत्रांतर्गत मौजे पाखरुड शिवारात बेकायदा अफूच्या शेतीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ५८ किलो ओला अफू जप्त केला आहे. या प्रकरणात तीन शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे ८ लाख ७७ हजार रुपये इतकी आहे.

गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पाखरुड शिवारात अशोक चव्हाण, राजेंद्र चव्हाण आणि धोंडिबा चव्हाण यांनी आपल्या शेतजमिनीत अंमली पदार्थ असलेल्या अफूची बेकायदा लागवड केल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (भूम) चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत व घोडके, तसेच पोलीस उपनिरीक्षक भाळे यांच्यासह अंमलदारांच्या पथकाने शेतांवर छापा टाकला. कारवाईदरम्यान पारदर्शकता राखण्यासाठी शासकीय पंच, कार्यकारी दंडाधिकारी, वजन-मापन अधिकारी, व्हिडिओग्राफर आणि फॉरेन्सिक पथकाला उपस्थित ठेवण्यात आले होते.

छाप्यात अशोक चव्हाण यांच्या गट क्रमांक ८ मधून ३६ किलो (किंमत सुमारे ५ लाख ४० हजार), राजेंद्र चव्हाण यांच्या गट क्रमांक १२ मधून १८ किलो (किंमत सुमारे २ लाख ७० हजार) आणि धोंडिबा चव्हाण यांच्या शेतातून ४.५ किलो (किंमत सुमारे ६७ हजार) अफूची झाडे जप्त करण्यात आली.

फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत जागेवरच पंचनामा करून सर्व मुद्देमालाचे वजन घेण्यात आले व संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ चित्रीकरणासह पार पाडण्यात आली. तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, वाशी पोलीस ठाणे येथे त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon