नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते . नाशिकमध्ये शुक्रवारी चौथ्या विश्व मराठी संमेलना उद्घाटनाचा आणि मराठी भाषा विभाग पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नाशिकला दाखल झाल्यानंतर त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला.
ओझर विमानतळावरून विश्व मराठी संमेलनासाठी मुख्यमंत्री यांचा ताफा के टी एच एम विद्यालयाकडे रवाना झाला असता, अशोकस्तंभ परिसरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. हातात,”जय जवान जय किसान, आम्हाला न्याय द्या”, असा शेतकरी आणि कांदा असलेला बॅनर घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा जातांना लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न केला.
गेल्या चार दिवसांपासून कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी आक्रमक झाले. २ दिवसांपूर्वीच नाशिकच्या चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याच्या भावात घसरण झाल्याने रस्ता रोको करत हा महामार्ग रोखून धरला होता. यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती. तर चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याला अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या उपोषणामध्ये काही शेतकऱ्यांची तब्येत देखील खालावली होती.
याच कारणामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कांदा उत्पादकांनी हा रास्ता रोको केला होता. त्यातच विश्व मराठी संमेलनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर असताना संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अशोक स्तंभ परिसरात बॅनर हातात घेऊन “साहेब कांद्याला भाव द्या” अशी मागणी करत त्यांचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
काही लोकांनी माझी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कार्यक्रम होऊ शकला जरी नसला तरी तुमचा प्रश्न महत्त्वाचा आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जरी गाडी अडवू शकले नसले तरी वैश्विक अडचणींमुळे कांदा उत्पादकांना अडचणी येत असतात. त्यासाठी बैठक घेऊ. त्यांच्या या प्रश्नावर नक्कीच लवकर तोडगा काढू”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.