नागपुरात डीआरआय ची धडक कारवाई; राजधानी एक्सप्रेसमधून शॅम्पूच्या बाटल्यांत लपवलेले ८५३ ग्रॅम कोकेन जप्त

नागपुरात डीआरआय ची धडक कारवाई; राजधानी एक्सप्रेसमधून शॅम्पूच्या बाटल्यांत लपवलेले ८५३ ग्रॅम कोकेन जप्त

योगेश पांडे / वार्ताहर

नागपूर : अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी तस्कर कोणकोणत्या क्लृप्त्या वापरू शकतात, याचा धक्कादायक नमुना नागपुरात समोर आला आहे. शॅम्पूच्या साध्या बाटल्यांमध्ये कोकेन लपवून राजधानी एक्सप्रेसमधून तस्करी केली जात असल्याचा प्रकार महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर युनिटने उघडकीस आणला. या कारवाईत सुमारे ४ कोटी २६ लाख रुपये किमतीचे ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे डीआरआय अधिकाऱ्यांनी हजरत निजामुद्दीन–केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसवर लक्ष ठेवले होते. संबंधित महिला दिल्लीहून बेंगळुरूकडे प्रवास करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूर स्थानकावर सापळा रचण्यात आला. गाडी आल्यानंतर संशयित महिलेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. पुढे अजनी स्थानकावर गाडी थांबताच तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

प्राथमिक तपासणीदरम्यान तिच्याकडे कोणतेही संशयास्पद साहित्य आढळले नाही. सामानात कपडे, सौंदर्यप्रसाधने व अन्य सामान्य वस्तू होत्या. मात्र कपड्यांमध्ये ठेवलेल्या दोन शॅम्पूच्या बाटल्या संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी तपास केला. बाटल्यांतील द्रव काढल्यानंतर त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या ५० सीलबंद कॅप्सूल्स आढळल्या.

या कॅप्सूल्समध्ये पांढऱ्या रंगाचे कोकेन पावडर स्वरूपात अत्यंत कौशल्याने लपवण्यात आले होते. फील्ड ड्रग टेस्ट किटद्वारे तपासणी केल्यानंतर तो पदार्थ कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. एकूण ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात त्याची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकरणी संबंधित महिलेला एनडीपीएस कायदा, १९८५ अंतर्गत अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणामागे मोठे आंतरराज्य तस्करी रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अटक केलेल्या महिलेच्या साथीदारांचा शोध सुरू असून पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon