मध्यरात्री पोलिसांचा धडक कारवाईचा धसका; कल्याणमध्ये बार आणि रेल्वे स्टेशन परिसरात अनैतिक व्यवसायावर घाव
२३ बारबाला, ४दलालांसहीत १३ वारांगना ताब्यात
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : परिमंडळ क्रमांक ३ अंतर्गत पोलिसांनी मध्यरात्री बार तसेच रेल्वे स्टेशन परिसरात अनैतिक व्यवसायाविरोधात धडक कारवाई करत एजंट आणि वारांगनांचे जाळे उघडकीस आणले. या कारवाईमुळे शहरातील बार व सार्वजनिक ठिकाणांवरील गैरप्रकारांना चाप बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
काल रात्री सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास रिगल बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी स्वतः पथकासह अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, के. आर. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी होते. छाप्यादरम्यान बारमध्ये तब्बल २३ तरुणी आढळून आल्या. याप्रकरणी संबंधित व्यवस्थापनासह इतरांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्यांविरोधातही महात्मा फुले चौक पोलीस ठाणे मार्फत स्वतंत्र कारवाई करण्यात आली. या कारवाईत चार एजंट आणि दहा पीडित अशा एकूण १४ महिलांवर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
शहरातील बार, लॉज तसेच सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अनैतिक व बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पुढील काळातही तपासणी मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.