डोंबिवलीत शेजाऱ्याची घरात घुसून हत्या; घरबांधणीच्या वादातून तरुणाचा चाकू हल्ला
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : घर बांधण्याच्या वादातून शेजारी राहणाऱ्या तरुणाने घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला करत एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फरार झाला आहे. टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रताप चौधरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. खंबाळपाडा परिसरात घर बांधण्याच्या कारणावरून प्रताप चौधरी आणि शेजारी राहणारा रोहित शेलार यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच सोमवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास रोहित शेलार याने प्रताप चौधरी यांच्या घरात घुसून त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रताप चौधरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी रोहित शेलार घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती घेत तपास सुरू केला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती डोंबिवली विभागाचे एसीपी सुहास हेमाडे यांनी दिली.
दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या हत्याकांडामुळे खंबाळपाडा परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.