अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण, जंगलात कैद ठेवत ५ दिवस अत्याचार; तिन्ही आरोपी जेरबंद
योगेश पांडे / वार्ताहर
अहिल्यानगर – इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरण ताजे असतानाच जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल पाच दिवस जंगलात कैद ठेवत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी बंदची हाक दिल्याने वातावरण तणावपूर्ण झालं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील कानडगाव येथील आदिवासी कुटुंबातील मुलगी १३ फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडली. मात्र नंतर ती घरी परतलीच नाही. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोबाईल लोकेशन, तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली आणि पथकाने वेगाने हालचाल करत संशयितांवर लक्ष केंद्रित केलं.
मुख्य आरोपी मुक्तर हैदर पठाण याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ला परिसरातील जंगलात नेले असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. तिथे पाच दिवस तिला कैद करत अत्याचार केल्याचा आरोप आहे. तपास पथकाने धाडसी कारवाई करत जंगलातून मुलीची सुखरूप सुटका केली असून या प्रकरणी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या आणखी दोघांना पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक नागरिक एकवटले असून कानडगाव व परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे. भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनीही राहुरीत आंदोलन करत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडितेला न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी व अशा घटनांना आळा बसावा, अशी मागणी विविध संघटनांकडून केली जात आहे. जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या काही दिवसांत राज्यात व जिल्ह्यात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.