भाजप आमदाराला पाच लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक; कर्नाटकच्या राजकारणात खळबळ

Spread the love

भाजप आमदाराला पाच लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक; कर्नाटकच्या राजकारणात खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

कर्नाटक : कर्नाटकात भ्रष्टाचारविरोधी कारवाईत मोठी घडामोड समोर आली असून, भारतीय जनता पक्ष (भाजप)च्या एका आमदाराला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी ही कारवाई केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

शिरहट्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार चंद्रू लामाणी यांना लोकायुक्त पथकाने सापळा रचून पकडले. प्राथमिक माहितीनुसार, एका कंत्राटदाराकडून तब्बल ११ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यातील पहिल्या टप्प्यातील पाच लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडग जिल्ह्यातील लघुसिंचन विभागाच्या एका प्रकल्पाशी संबंधित कामाच्या मंजुरीसाठी आमदाराने कंत्राटदाराकडे लाचेची मागणी केली होती. संबंधित कंत्राटदाराने याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला. कारवाईनंतर आमदार लामाणी यांची प्राथमिक चौकशी करून त्यांना औपचारिकरित्या अटक करण्यात आली.

या प्रकरणात आमदारासोबत त्यांच्या दोन सहाय्यकांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. लोकायुक्तांच्या या कारवाईमुळे कर्नाटक राज्यातील राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon