अंधेरीत एमटीएनएल केबल चोरीचा पर्दाफाश; ५० लाखांचे केबल व दोन टेम्पो जप्त
सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : अंधेरी पश्चिम परिसरात एमटीएनएलच्या केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत सुमारे ५० लाख रुपये किमतीचे एमटीएनएल केबल आणि दोन टेम्पो जप्त करण्यात आले असून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा वेलफेयर असोसिएशन ग्राउंड परिसरात, आराम नगर रोडजवळ ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, काही जण रस्त्यावरील झाकण उघडून भूमिगत एमटीएनएल केबल चोरी करत होते. त्यावेळी परिसरात गस्त घालत असलेल्या एमटीएनएल कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली.
एमटीएनएल कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी आरोपींना पकडून ठेवले. त्यानंतर वर्सोवा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच मुंबई पोलीस अंतर्गत वर्सोवा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन टेम्पोसह चोरीसाठी वापरण्यात आलेले सुमारे ५० लाख रुपये किमतीचे एमटीएनएल केबल जप्त केले.
वर्सोवा पोलीस ठाण्याचे नाईट इंचार्ज एपीआय पटेल यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, एमटीएनएल केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे यापूर्वीच एमटीएनएल प्रशासनाने वर्सोवा, अंबोली, गोरेगाव आणि मालाड पोलीस ठाण्यांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर एमटीएनएल कर्मचारी रात्रीच्या वेळी विविध भागांमध्ये निगराणी आणि गस्त घालत असल्याची माहिती समोर आली आहे.