ऑनलाईन विवाहसंकेतस्थळावरून ओळख; लग्नाचे आमिष दाखवून ४४ वर्षीय महिलेची ५९ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

Spread the love

ऑनलाईन विवाहसंकेतस्थळावरून ओळख; लग्नाचे आमिष दाखवून ४४ वर्षीय महिलेची ५९ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : ऑनलाईन जोडीदार शोधताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची ओळख Shaadi.com या ऑनलाईन विवाहसंकेतस्थळावरून एका व्यक्तीशी झाली. सुरुवातीला विश्वास संपादन करून आरोपीने विवाहाचे आश्वासन दिले. त्यानंतर विविध कारणे पुढे करत टप्प्याटप्प्याने मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळण्यात आली.

दरम्यान, बराच काळ उलटूनही विवाहाबाबत कोणतीही ठोस पावले न उचलल्याने महिलेने पैसे परत मागण्यास सुरुवात केली. मात्र, यावेळी आरोपींनी तिला थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

चंदननगर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात फसवणूक आणि धमकी देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींनी वापरलेली बँक खाती, मोबाईल क्रमांक आणि ऑनलाईन व्यवहारांचा तपशील तपासला जात असून सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.

दरम्यान, ऑनलाईन विवाहसंकेतस्थळांचा वापर करताना नागरिकांनी समोरच्या व्यक्तीची खातरजमा करणे, आर्थिक व्यवहार टाळणे आणि संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon