रूम बांधकामाचा पंचनामा टाळण्यासाठी १.९५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप; ग्राम महसूल अधिकारी रंगेहात जाळ्यात
पोलीस महानगर नेटवर्क
पालघर : वसई तालुक्यातील बिलालपाडा येथील ग्राम महसूल अधिकारी महिला कर्मचाऱ्याला ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. उज्वला प्रवीण पाटील (वय ४८) असे अटक करण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचे नाव असून त्या बिलालपाडा/पेल्हार सज्जामध्ये कार्यरत आहेत.
तक्रारदार आणि त्यांच्या मामांचा चाळ बांधकामाचा व्यवसाय आहे. महेंद्र यादव यांनी २०१५ मध्ये बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक १३/०३ मधील जमीन खरेदी केली होती. संबंधित जमिनीबाबत न्यायालयीन वाद सुरू असताना तेथे चाळ बांधकाम करण्यात आले आहे. त्यामध्ये तक्रारदाराची एक आणि त्यांच्या मामांच्या तीन खोल्या आहेत.
एसीबीकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संबंधित बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी तसेच जमिनीवर करण्यात आलेल्या माती भरावाचा पंचनामा टाळण्यासाठी उज्वला पाटील यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर पडताळणीदरम्यान त्यांनी रूम बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी ४५ हजार रुपये आणि माती भरावाचा पंचनामा टाळण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये, अशी एकूण १ लाख ९५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी एसीबी पालघर विभागाने २५ मे रोजी सापळा रचला. पेल्हारगाव येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयात तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना उज्वला पाटील यांना दुपारी १२.५१ वाजता रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक राकेश डांगे हे पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दादाराम करांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. एसीबीने नागरिकांना भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.