ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने ६३ लाखांची फसवणूक; कल्याण-डोंबिवलीत दोन गुन्हे दाखल

Spread the love

ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने ६३ लाखांची फसवणूक; कल्याण-डोंबिवलीत दोन गुन्हे दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : ऑनलाईन शेअर गुंतवणूक आणि कंपनी स्थापन करून देण्याच्या आमिषाने कल्याण-डोंबिवली परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तक्रारदारांची एकूण ६३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाणे आणि मानपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्याणमधील खडकपाडा भागात राहणारे विजय झाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिध्देश आणि मनीष कुमार मिश्रा यांनी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर संपर्क साधून शेअर गुंतवणूक कंपनीचे नाव सांगितले. संबंधित संकेतस्थळावर नोंदणी करून गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण करून देण्यात आली. त्यानंतर मुलाचे डिमॅट खाते एका अन्य गुंतवणूक योजनेशी जोडून एका वर्षात १५ लाख रुपयांवर १ कोटी १५ लाख रुपयांचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. मे २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून ४४ लाख ४५ हजार रुपये उकळल्यानंतर ना परतावा मिळाला, ना मूळ रक्कम परत करण्यात आली. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, डोंबिवलीतील लोढा पलावा परिसरात राहणाऱ्या भावना देवकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, पुणे येथील सलील श्रीपाद मेहेंदळे यांनी कंपनी स्थापन करून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी ऑनलाईन माध्यमातून स्वतःच्या बँक खात्यावर तसेच कॅनडातील एका कंपनीच्या नावावर पैसे पाठविण्यास सांगितले. सन २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकूण १९ लाख ५० हजार रुपये घेतल्यानंतर ना कंपनी स्थापन करण्यात आली, ना रक्कम परत देण्यात आली. या प्रकरणाचा तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती जगताप करत आहेत.

दरम्यान, वाढत्या ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उच्च परताव्याच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित संस्थांची खातरजमा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon