मंत्रालयानंतर बीडमध्ये एसीबी ची धाड; लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे अडकला जाळ्यात
योगेश पांडे / वार्ताहर
बीड – सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला असून एसीबीच्या छाप्यात हा उघड झाल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पडकल्याची घटना ताजी असतानाचा, मुंबईतील मुलूंड येथे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासही एबीसीने अटक केली आहे. आता, बीड जिल्ह्यातील परळीतून लाचप्रकरणाची मोठी घटना समोर आली असून चक्क तहसीलदारच जाळ्यात अडकला आहे.
परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाच प्रकरणात अडकल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदारास सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती वीस हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने रंगेहात पकडण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, तक्रारदाराच्या हालचालीवर संशय आल्याने तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगितले. तरीही एसीबीने आवश्यक ते सर्व पुरावे संकलित करून व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, एसीबीच्या या कारवाईमुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर गेल्या काही दिवसांत एसीबीच्या वाढत्या छाप्यांमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, अद्यापही सरकारी कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांचे काम करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचं भीषण वास्तव आहे.