भिवंडीत भाजपला मोठा धक्का; महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप बंडखोर’ नारायण चौधरी विजयी

Spread the love

भिवंडीत भाजपला मोठा धक्का; महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप बंडखोर’ नारायण चौधरी विजयी

योगेश पांडे / वार्ताहर

भिवंडी – भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतील ट्विस्टमुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. शुक्रवारी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत ४८ मतं मिळवत भिवंडी सेक्युलर फ्रंटचे उमेदवार असलेले ‘भाजप बंडखोर’ नारायण चौधरी विजयी झाले. कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांना २५, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना १६ मतं मिळाली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या नगरसेवकांनीही कोणार्क विकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. महापौरपदासाठी हात वर करुन मतदानाची प्रक्रिया झाली. त्यानंतर चंद्रपुरात झालेल्या पराभवाचा वचपा काँग्रेसने भिवंडीत काढल्याची चर्चा आहे.

भिवंडी महापालिका निवडणुकीत महायुतीत फूट पडल्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले होते. अशातच भारतीय जनता पक्षाकडून महापौरपदाचे प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या नारायण चौधरी यांनी उमेदवारी न मिळाल्याने भिवंडी सेक्युलर फ्रंटसोबत जाण्याचा निर्णय घेत खळबळ उडवून दिली होती. त्यांना पक्षातील नऊ नगरेसवकांचा पाठिंबा असल्यामुळे भाजपमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. तर भिवंडी सेक्युलर फ्रंटमधील काँग्रेसचे मोमीन तारिक अब्दुल बारी हेमहापौरपदासह उपमहापौरपदासाठीही अर्ज भरुन रिंगणात होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे मिळून एकूण ४२ नगरसेवक होतात. समाजवादी पक्षाचे नगरसेवक भिवंडी फ्रंटमध्ये सहभागी न झाल्याने काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने बहुमतासाठी अन्य एका आघाडीची मदत घेण्याबाबत चर्चा सुरु केली होती. मात्र त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता. अशातच नारायण चौधरींचा गट ९ नगरसेवकांसह फुटून भाजपात आल्याचं समोर आलं.

भिवंडी महापालिकेत विशेष सभेच्या सुरुवातीलाच महापौरपदासाठी रिंगणात उतरलेल्या शिवसेनेच्या बाळाराम चौधरी, सुचिता म्हात्रे यांच्यासह ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे तिघे जण रिंगणात उरले. यामध्ये भाजपच्या स्नेहा पाटील, भिवंडी सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरी, तसेच कोणार्क विकास आघाडीचे नेते विलास पाटील यांचा समावेश होता. महापौरपदासाठी हात वर करुन मतदानाची प्रक्रिया झाली असता ४८ मतं मिळवत चौधरींनी महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. भाजपच्या स्नेहा पाटील यांना अवघ्या १६ मतांवर समाधान मानावं लागलं. तर कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्या बाजूने शिवसेनेच्या १२ आणि सपच्या सहा नगरसेवकांनी मतदान केलं. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेत कोणार्कला पाठिंबा दिला.

महापौर निवडणुकीच्या तोंडावरच माजी महापौर असलेल्या आणि यंदाही रिंगणात उतरलेल्या विलास पाटील यांना ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षीच्या एका फसवणुकीच्या प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली होती. महापौरपदाच्या निवडणुकीत पाटील किंगमेकर ठरत निर्णायक भूमिका बजावण्याच्या शक्यतेमुळे सगळी चक्रं फिरली होती. अखेर निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्तात विलास पाटील यांना महापालिकेत आणण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon