अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळला २० वर्षीय तरुणीचा मृतदेह; पोलिसांनी सावत्र आई आणि वडिलांना घेतलं ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – वाळूज महानगर परिसरातील तिसगाव चौफुली येथे गुरुवारी १९ फेब्रुवारी रात्री उशिरा एका रिक्षामध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.गादीमध्ये गुंडाळून हा मृतदेह गुपचूप नेला जात होता, मात्र एका जागरूक नागरिकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी वाळूज पोलिसांनी तरुणीच्या सावत्र आई आणि वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक कुटुंब रिक्षामधून गादीत काहीतरी गुंडाळून कन्नडच्या दिशेने जात होते. मात्र, त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने एका नागरिकाने तातडीने डायला ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तिसगाव चौफुली येथे रिक्षा अडवली.पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता, आत गादीमध्ये गुंडाळलेला एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी जेव्हा कुटुंबाकडे विचारपूस केली, तेव्हा मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली असून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावी घेऊन जात आहोत, अशी माहिती सावत्र आई-वडिलांनी दिली. मात्र, कायदेशीर प्रक्रियेविना आणि पोलिसांना माहिती न देता अशा प्रकारे मृतदेह नेला जात असल्याने संशय बळावला आहे.हा प्रकार नेमका काय आहे, मुलीने खरोखरच आत्महत्या केली की तिचा घातपात झाला, याचा तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.