भिवंडीतील कामतघर परिसरात गस्तीवरील पोलिसांवर हल्ला; तिघांना अटक
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी : भिवंडी शहरातील कामतघर परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना नारपोली पोलीस ठाणे हद्दीत घडली.
नियंत्रण कक्षाला नागरिकांच्या अंगावर पाण्याचे फुगे फेकले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन पोलीस कर्मचारी कामतघर परिसरात पोहोचले. संशयितांना जाब विचारताना त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत हातातील लाठी आणि दुचाकीची किल्ली हिसकावून घेत धक्काबुक्की केल्याचे पोलिसांनी सांगितले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने अतिरिक्त पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जयस चौधरी, यश कदम आणि नरेश घाडगे या तिघांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे व पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.