मासिक भाड्याच्या आमिषाने ३२ वाहने लाटली; वागळे इस्टेट पोलिसांची धडक कारवाई, २.४४ कोटींचा मुद्देमाल जप्त
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : मासिक भाड्याने वाहने लावून देण्याचे आमिष दाखवून वाहनमालकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला वागळे इस्टेट पोलीस ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ३२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची एकूण किंमत सुमारे २ कोटी ४४ लाख रुपये आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी “मासिक भाडे देतो” असे सांगून वाहनमालकांकडून वाहने ताब्यात घेत असे. मात्र भाडे न देता तसेच वाहने परत न करता ती इतरांकडे गहाण ठेवून आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०/२०२६ अन्वये भा.दं.सं. कलम ४२० व ४०६ अंतर्गत ७ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संदीप रघु शेट्टी (वय ३८, रा. उळवे) याला ८ फेब्रुवारी रोजी अटक केली. चौकशीत आरोपीने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण आणि परभणी परिसरातील अनेक वाहनमालकांना अशाच प्रकारे गंडविल्याची कबुली दिली. पुढील तपासात या ठिकाणांहून ३२ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली असून, आणखी वाहने हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहा पोलीस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या धडाकेबाज कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, फसवणुकीचे बळी ठरलेले अन्य वाहनमालकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. वागळे इस्टेट पोलिसांच्या या वेगवान कारवाईमुळे वाहनमालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.